Category Archives: Shared

अभियंत्यांची फॅक्टरी!


लेखिका:सुचिता देशपांडे, (लोकसत्ता वृत्तपत्र )
suchita.deshpande@expressindia.com

अभियांत्रिकी विद्याशाखांचा विस्तार आणि उपयोजन यात सातत्यपूर्ण वाढ होत असली तरीही उद्योगक्षेत्राचे सद्य स्वरूप वा गरजांचे प्रतिबिंब अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमात आजही दिसून येत नाही. पाठांतरावर भर देणारी शिक्षणपद्धती आजही अभियांत्रिकी विद्याशाखेत सुखेनैव नांदत आहे. अशा या भूलभुलैयात एक प्रश्न मात्र कायम राहतो, तो म्हणजे तंत्रज्ञानाची आस असणारा खराखुरा अभियंता आपण कधी घडविणार? १५ सप्टेंबर रोजी देशभर साजरा केल्या जाणाऱ्या ‘इंजिनीअर्स डे’च्या निमित्ताने अभियांत्रिकी शिक्षणाच्या सद्यस्थितीचा एक धांडोळा-
अभियंता हा राष्ट्रउभारणीतील पडद्यामागचा खरा शिल्पकार असतो. मग ते एका धरणाचे बांधकाम असो वा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेतलेली गरूडझेप असो, त्यामागच्या सांघिक कामगिरीत अभियंत्याचा वाटा हा लक्षणीय असतो. तंत्रज्ञानाच्या एकाहून एक सरस करामती साकारणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा अभियांत्रिकी विद्याशाखेचा आज विस्तार वाढतोय आणि उपयोजनही! असे असले तरी उद्योगक्षेत्राचे सद्य स्वरूप वा गरजांचे  प्रतिबिंब अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमात आजही दिसून येत नाही.  अभियांत्रिकीच्या मूलभूत शिक्षणापेक्षा   पदवी प्रमाणपत्राच्या भेंडोळ्याचेच कौतुक आज अधिक होताना दिसते. तंत्रज्ञानाची आस म्हणून नव्हे तर वेतनाच्या फुगीर आकडय़ासाठी या विद्याशाखेचा प्रवेश विद्यार्थी-पालकांना आज महत्त्वाचा वाटू लागला आहे आणि म्हणूनच आज अभियांत्रिकीची पदवी संपादन केलेला विद्यार्थी उद्योगक्षेत्रातील सद्यस्थितीविषयी, त्यातील अद्ययावत बदलांविषयी खरोखरीच जागरूक असतो का आणि एक अभियंता म्हणून तो या क्षेत्रात स्वत:चे योगदान देऊ शकतो का, हा प्रश्न कायम राहतो.
आज विविध विद्याशाखेतील अभियंत्यांची संख्या वाढतेय, आज अभियांत्रिकी क्षेत्राचा परीघ विस्तारतोय. मात्र उद्योगक्षेत्र आणि विद्यापीठ-महाविद्यालयांमध्ये आजही म्हणावा तितका सुसंवाद दिसून येत नाही. म्हणूनच प्रत्यक्ष उद्योगक्षेत्राला अपेक्षित असलेले मनुष्यबळ आणि पदवीधारक विद्यार्थ्यांने संपादन केलेले शिक्षण यात आजही कमालीची तफावत दिसून येते. त्यात आशादायक बाब अशी आहे की, ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिली’चा भाग म्हणून आज आघाडीच्या काही कॉर्पोरेट कंपन्या अभियांत्रिकी शिक्षणात आपले योगदान देताना दिसू लागल्या आहेत. टाटा इन्फोटेक लॅबोरेटरी, इन्टेल मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स लॅबोरेटरी, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली लॅबोरेटरी फॉर इंटेलिजन्ट इंटरनेट रीसर्च, व्हीएलएसआय डिझाइन अ‍ॅण्ड डिव्हाइस कॅरेक्टरायझेशन, टेक्सास इन्स्ट्रमेन्टस् डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, वाधवानी इलेक्ट्रॉनिक्स लॅबोरेटरी, क्सिलिक्स एफपीजीए लॅबोरेटरी, कमिन्स इंजिन रीसर्च लॅबोरेटरी आदी महत्त्वपूर्ण प्रयोगशाळांचा यात समावेश आहे.  या आणि अशा आणखी काही कॉर्पोरेट  कंपन्यांतर्फे अभियांत्रिकी महाविद्यालयात अद्ययावत प्रयोगशाळांची निर्मिती तसेच विद्यार्थी- प्राध्यापकवर्गाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात आहेत. यात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी २००७ सालापासून हाती घेण्यात आलेल्या विप्रो लिमिटेडच्या ‘मिशन टेन एक्स’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचाही प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ‘विप्रो’च्या ‘क्वान्टम इनोव्हेशन प्रोजेक्ट’चा ‘मिशन टेन एक्स’ हा एक भाग असून या उपक्रमाअंतर्गत अभियांत्रिकीची पदवी प्राप्त  केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये रोजगारभिमुखता वाढावी, यासाठी प्रयत्न केले जातात.
कॉर्पोरेट कंपन्यांतर्फे अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणासंदर्भात हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांत प्रयोगशाळांच्या स्थापनेसोबत देशभरातील अभियांत्रिकी विद्यार्थी तसेच  प्राध्यापकवर्गासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा ताळमेळ हा उद्योगाच्या सद्य गरजांशी कसा घालता येईल, यावर मंथन केले जाते. देशातील विविध अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांच्या सहकार्याने वा संलग्नतेने असे उपक्रम राबवले जात आहेत. अशा गिन्याचुन्या उपक्रमांची संख्या आगामी काळात अधिक वाढली तर अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे संबंधित विद्याशाखांतील सद्यस्थितीचे आकलन वाढण्यास मदत होईल. अशा तऱ्हेचे विद्यापीठ आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी एकत्रित काम करण्याचे प्रयत्न परदेशी विद्यापीठांमध्ये मोठय़ा प्रमाणावर होताना दिसून येतात. तिथे अध्यापनाच्या पलीकडे पोचत महत्त्वपूर्ण  उपक्रमांचा समन्वय साधण्याचे कामही विद्यापीठे करताना दिसतात. त्या तुलनेत आपल्याकडील विद्यापीठे मात्र अभ्यासक्रम, परीक्षापद्धती आणि निकालपद्धती यांच्या घोळात इतकी अडकलेली असतात की, त्या पलीकडच्या बाहेरील  जगातील अद्ययावत तंत्रज्ञानाची दखल घेण्याची, त्यासंबंधित कौशल्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याची  आवश्यकता विद्यापीठांना भासत नाही.
आपल्या देशात ‘इंजिनीअर्स डे’ हा साजरा केला जातो तो महान अभियंता सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त! ज्यांनी आपल्या प्रगाढ बुद्धिमत्तेचा उपयोग परदेशात जाण्यासाठी नाही, तर देशाच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अमूल्य योगदान  देण्यासाठी केला. आज मात्र आपल्याकडील बहुसंख्य प्रज्ञावान विद्यार्थी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भरभक्कम वेतनाचे पॅकेज हातात पडून परदेशात स्थायिक होण्यात धन्यता मानतात. अशा हुशार विद्यार्थ्यांनी मायदेशात वळावे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी  व्हावा, यासाठीही देशपातळीवर होणारे प्रयत्न  तोकडे पडतात. ज्येष्ठ वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी एका  भाषणात आयआयटीला पांढरा हत्ती असे संबोधन वापरले होते. देशाच्या पैशावर अद्ययावत सुविधांनिशी प्रगत ज्ञान प्राप्त करणारे हे विद्यार्थी  आपल्या देशाच्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीत नंतर किती वाटा उचलतात, हा त्यांचा बिनतोड सवाल होता. सरकारी महाविद्यालयात पदवी  शिक्षणाच्या चार वर्षांत सरकारचे लाखाहून अधिक रुपये एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांवर खर्च होत असतात. मात्र त्याची परतफेड करण्याची गरज विद्यार्थ्यांना वाटत नाही. अभियांत्रिकी शिक्षणात नावाजलेल्या महाविद्यालयांमधून जे हुशार विद्यार्थी अभियंते म्हणून बाहेर पडतात, त्यातील अनेकजण व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या वळचणीला जातात. पुढे एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत घसघशीत वेतन मिळवताना तो करत असलेल्या कामाचा आणि  अभियांत्रिकी शिक्षणाचा दुरान्वयानेही संबंध उरत नाही. अशा वाढत्या ट्रेंडमुळे प्रत्यक्ष अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्याचा तुटवडाही आज उद्योग क्षेत्रात जाणवू लागला आहे.
अभियांत्रिकीच्या पदवी शिक्षणात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वेध घेतला जाणे अपेक्षित आहे. मात्र इतर विद्याशाखांप्रमाणेच अभियांत्रिकी शिक्षणाचा  विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक्रम बदलण्यासाठी १० वर्षांचा कालावधी उलटावा लागतो. यंत्रणांच्या घोळात केवळ बोटावर मोजता येतील, अशी गिनीचुनी स्वायत्त महाविद्यालयांची संख्या वगळता इतरांच्या वाटय़ाला येणारी शैक्षणिक स्वायत्तता मात्र शून्य आहे. आज अभियांत्रिकी पदवी शिक्षणाच्या विविध विद्याशाखांत चार वर्षांमध्ये जे भाराभर विषय शिकवले जातात, त्याची बऱ्यापैकी ओळख  विद्यार्थ्यांना होत असते खरी, मात्र त्या विषयांमध्ये सखोल ज्ञान मिळण्यासाठी काय करता येईल, याची वाट विद्यार्थ्यांना दाखवून देणेही आवश्यक आहे.
इतर कुठल्याही पदवी अभ्यासक्रमातील त्रुटी आज अभियांत्रिकी अभ्यासक्रमातही कायम आहेत, ज्यात सॉफ्ट स्किल्सची  परिणामकारकता वा ती शिकण्याची अपरिहार्यता विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही. अभियांत्रिकी पदवीच्या पहिल्या वर्षी तोंडी लावण्यापुरता अर्थशास्त्र विषय असतो खरा, पण त्यात उत्तीर्ण होण्यापुरत्या पाटय़ा टाकण्यात विद्यार्थ्यांना गैर वाटत नाही. एक मात्र नक्की, की शिक्षणानंतर प्रत्यक्ष करिअर  करताना जी भावनिक बुद्धिमत्ता सर्वाधिक महत्त्वाची ठरते, त्यासंदर्भातील शिक्षणाचा लवलेशही आजही अभियांत्रिकी पदवी शिक्षणात दिसून  येत नाही. आजही शिक्षण जीवनाभिमुख वा एकात्म नसल्याची चुणूकच यातून दिसून येते.
यंदा राज्यभरात अभियांत्रिकी शिक्षणाच्या ४२ हजार प्रवेशजागा रिक्त आहेत. याची वेगवेगळी कारणे दिसून येतात. सामायिक प्रवेश परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे अभियांत्रिकीच्या प्रवेशापासून वंचित राहिलेले विद्यार्थी जसे आहेत, तसेच अवाजवी फीवाढ आणि भरमसाठ अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिलेली परवानगी हेदेखील यामागचे कारण आहे. त्यापलीकडचे आणखी एक कारण म्हणजे आज अव्वाच्या सव्वा पैसे भरून चार वर्षांंनी अभियांत्रिकीची पदवी पदरी पडण्याच्या अपेक्षा करण्याऐवजी एखाद्या मान्यताप्राप्त संगणक संस्थेत वर्ष-दोन वर्षांचा कॉम्प्युटर वा इलेक्ट्रॉनिक्स विषयक कोर्स करण्याकडे मुलांचा अधिक कल दिसून येतो.


आज वर्षांकाठी महाराष्ट्रात सुमारे सव्वा लाख विद्यार्थी अभियांत्रिकीची पदवी संपादन करतात. गुणवत्ता जपणाऱ्या काही महाविद्यालयांचा अपवाद वगळता नफेखोरीचा धंदा मांडणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सुळसुळाटच आज अधिक दिसून येतो. तिथल्या शिक्षणाचा दर्जा आणि तिथल्या पायाभूत सोयीसुविधा सुमार दर्जाच्या असतात. त्या महाविद्यालयाचा अत्यल्प निकाल, चौकशी समित्यांचे महाविद्यालयांवर ठपका ठेवलेले अहवाल हेच अधोरेखित करीत असतात. अशा स्थितीत दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडलेल्या सव्वा लाख नव्याकोऱ्या अभियंत्यांच्या कौशल्याबद्दल आणि त्यांच्या ज्ञानाबद्दल छातीठोकपणे भाष्य कोण करेल? आणि मग पदवीच्या अखेरच्या वर्षांत आघाडीच्या नामांकित महाविद्यालयांतील गुणवान विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्य़ूद्वारे बडय़ा कंपन्यांचे दार खुले होते खरे, मात्र त्यांच्याबरोबरीने सर्वसाधारण महाविद्यालयांमधून बाहेर पडणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा स्ट्रगल पीरिअड मात्र तेव्हा सुरू झालेला असतो.. या  विद्यार्थ्यांना वाली कोण?
आपली विद्यापीठे ही परीक्षापद्धती, अभ्यासक्रम, निकालातील घोळात अडकून पडलेल्या असतात. महाविद्यालये नफ्याची गणितं जमविण्यात व्यग्र असतात. त्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संख्येला कात्री लावली जाते, प्रयोगशाळा, पायाभूत सुविधांना ग्रहण लागते. या सर्वावर करडी नजर ठेवणे ज्यांच्याकडून अपेक्षित आहे, ती विद्वत सभा, विविध अभ्यास मंडळं, परीक्षा मंडळं, विद्यार्थी संघटना हे परस्परांवर कुरघोडीचे राजकारण करण्यात गर्क असतात. अशा वेळेस विद्यार्थीहिताकडे कुणाचे लक्ष जाणार?
आज अभियांत्रिकी विद्याशाखा हे एक फॅक्टरी बनली आहे. अव्वाच्या सव्वा फी आकारणाऱ्या क्लासेसनी आपले चांगले बस्तान बसवले  आहे. अभ्यासाची गाईडस् लोकप्रिय होऊ लागली आहेत. अगदी आता-आतापर्यंत जिथे आयआयटीचा प्रवेश या मुलाच्या बुद्धिमत्तेवर होतो, असे जिथे मानले जायचे, तिथे लाखो क्लासेसचा सुळसुळाट झाला आहे.
आज अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये जे प्रोजेक्ट वर्क केले जाते, त्याची प्रक्रिया समजून घेणे हा मौजेचा अनुभव ठरावा. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांंना सामूहिकरीत्या वा व्यक्तिगतरीत्या जे प्रोजेक्ट सादर करावे लागते, त्यात मोठय़ा प्रमाणावर वाङ्मयचौर्य वा सरळसरळ प्रोजेक्ट विकत घेण्याचे गैरप्रकार बोकाळले आहेत. यात प्रोजेक्टचा अभ्यासक्रमात ज्यासाठी अंतर्भाव करण्यात आला आहे, त्या मूळ उद्देशालाच तडा जात आहे.
अभियांत्रिकी पदवीचा विद्यार्थी हा अंतिम वर्षांत पोहोचतो, तेव्हा आठ सत्रांमध्ये तो विविध विषयांचे ज्ञान (?) कमावतो. अशा वेळेस अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षांत विद्यार्थ्यांने आतापर्यंत शिकलेल्या विषयांचे एकत्रित उपयोजन का असू नये? आतापर्यंत त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानावर अवलंबित परीक्षा घेता येणार नाही का? मात्र तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्याऐवजी पाठांतरावर भर देणारी शिक्षणपद्धती आजही अभियांत्रिकी शिक्षणात नांदत आहे आणि म्हणूनच एक चांगला अभियंता होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची  कौशल्ये विकसित होताना दिसत नाहीत.
या सगळ्यात पदवी घेऊन बाहेर पडतो तो एक सपक अभियंता आणि त्याच्या या लौकिक यशात सारे आपला आनंद मानत असतात, तो  स्वत विद्यार्थी झालो कसाबसा म्हणत स्वत:च सुखावत असतो. त्याचे पालक पाल्याच्या इंजिनीअर होण्यात धन्यता मांडत असतात, क्लास,  कॉलेज उत्तम निकाल लागण्याच्या नादात हरखून जात असतात आणि विद्यापीठही अधिक सुस्त होते. अशा या भूलभुलैयात एक प्रश्न मात्र  कायम राहतो, तो म्हणजे तंत्रज्ञानाची आस असणारा खराखुरा अभियंता आपण कधी घडविणार?

Original Link: http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=249135:2012-09-09-16-56-22&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116

%d bloggers like this: